(जावली/ अजिंक्य आढाव ): श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र पानवली ते श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर असा शिवभक्त आदमबाबा पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने पार पडतो. गेल्या २३ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या वारीला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही पालखी सोहळ्यामुळे जावली परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
जावली ता फलटण येथून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर कडे मार्गस्थ होताना….!
श्री क्षेत्र महादेव नगर पानवली (राहुटेव परिसर, ता. दौंड, जि. पुणे) येथून निघणारी ही पालखी श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या दिशेने मार्गक्रमण करते. श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या दर्शनासाठी शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी हा पालखी सोहळा श्रद्धेचा आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो.
शिवभक्त आदमबाबा पालखीचे जावली येथे दरवर्षी मुक्कामाचे आयोजन केले जाते. पालखी जावली येथे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थ व भाविकांकडून तिचे उत्साहात स्वागत करण्यात येते. पालखीच्या आगमनाने गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. दर्शनासाठी तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
या सोहळ्याचे प्रमुख म्हणून ह.भ.प. कैलास अण्णा गाढवे हे नियोजन व मार्गदर्शन करीत आहेत. पालखी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कीर्तनकार ह.भ.प. अनिल महाराज चव्हाण यांच्या कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक व सामाजिक संदेश देण्यात आला.
श्रावण महिन्यातील धार्मिक वातावरण, हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि पालखी सोहळ्यामुळे जावलीसह परिसरातील वातावरण भक्तिमय होते. अनेक भाविक पालखीसमवेत मार्गक्रमण करून आपली श्रद्धा व्यक्त करतात. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांसाठी विविध सेवा व व्यवस्था करण्यात येतात.
गेल्या २३ वर्षांपासून कोणताही खंड न पडता सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. नव्या पिढीपर्यंत धार्मिक परंपरा, संतविचार आणि वारकरी संस्कृती पोहोचविण्याच्या दृष्टीनेही या पालखी सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे.
श्रावणातील या पवित्र वारीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवभक्त आदमबाबा पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.