(जावली /अजिंक्य आढाव ): फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ₹२.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान, १ ऑगस्ट २०२६ रोजी सस्तेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने छापा टाकला.
कारवाईदरम्यान २८० लिटर गावठी हातभट्टीची विषारी दारू, दोन लोखंडी कढई, जर्मनची काळ्या-पांढऱ्या रंगाची घमेली, बाभळीच्या झाडाच्या जळाऊ लाकडासह गुळाचा डेप, तुरटी व इतर साहित्य असा एकूण ₹२,४६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पियुष रमेश चव्हाण (रा. सोमवार पेठ, ता. फलटण) याला अटक करण्यात आली आहे. तसेच कृष्णा उर्फ पप्प्या विश्वास पवार, गणेश मोहिते आणि रुपेश चव्हाण (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी अवैध धंद्यांविषयी नागरिकांनी गोपनीय माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, अमोल जगदाळे तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.