(जावली /अजिंक्य आढाव ): विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजांनुसार व्यावसायिक व तांत्रिक कौशल्ये प्राप्त व्हावीत, तसेच पदवी शिक्षणासोबत रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या वाणिज्य विभागातर्फे Income Tax & GST आणि SAP FICO या अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम मुधोजी महाविद्यालय आणि Suraksha NextGen Skills, Pune यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी Income Tax व GST अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदा त्यासोबत SAP FICO अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. जे. पी. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी बोलताना मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी बदलत्या उद्योगविश्वात केवळ पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी त्यासोबत व्यावसायिक व तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित Hands-on Training विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाच्या निमित्ताने मुधोजी महाविद्यालय आणि Suraksha NextGen Skills, Pune यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या करारावर Suraksha NextGen Skillsच्या प्रमुख श्रीमती स्नेहा पंडित आणि मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कौशल्यविकासाची संधी उपलब्ध होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी श्रीमती स्नेहा पंडित, श्री. प्रशांत गिजारे, श्री. अक्षय लाड आणि श्री. विक्रम पंडित हे तज्ज्ञ उपस्थित होते. श्रीमती स्नेहा पंडित व श्री. प्रशांत गिजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संबंधित अभ्यासक्रमांचे महत्त्व आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ललित वेळेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अमृता गायकवाड यांनी केले, तर आभार डॉ. एस. जी. निकम यांनी मानले. यावेळी वाणिज्य विभागातील प्राध्यापिका स्वाती सावंत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योगविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक ज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुधोजी महाविद्यालयाने सुरू केलेले हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेला नवी दिशा देणारे ठरणार आहेत.