फलटण, दि. २४ (प्रतिनिधी) – वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नयन अमरजित लोंगाणी (वय २८, मूळ रा. तारकपूर, अहिल्यानगर, सध्या कमिन्स हॉस्टेल, वाठार निंबाळकर) हे सप्टेंबर २०२५ पासून कमिन्स कंपनी, सुरवडी येथे नोकरीस आहेत. त्यांच्या सोबत हॉस्टेलमध्ये राहणारे सहकारी सौरभ कुमार (झारखंड), एम.डी. सितारे (बिहार), मोहम्मद हुसेन (अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम (जमशेदपूर, झारखंड) आणि सदानंद पुर्ती (जमशेदपूर, झारखंड) हे सर्व गुरुवारी रात्री सह्याद्री हॉटेल, बडेखान येथे जेवणासाठी गेले होते.
रात्री सुमारे ८ वाजता मारुती स्विफ्ट डिझायर (क्र. MH 16 ET 1756) या कारने ते जेवणासाठी गेले. परतीच्या प्रवासात हॉस्टेलजवळ आल्यानंतर मित्रांच्या आग्रहावरून ते ताथवडे घाट परिसरात फिरून आले. त्यानंतर ढवळ पाटी येथे आल्यानंतर मोहम्मद हुसेन याने कार चालविण्याची इच्छा व्यक्त केल्याने फिर्यादी नयन लोंगाणी यांनी वाहन त्याच्या ताब्यात दिले.
पुसेगाव–फलटण मार्गावर वाठार निंबाळकर गावाच्या हद्दीत आल्यानंतर मोहम्मद हुसेन याने कार अतिशय भरधाव वेगात चालवल्याने वाहनावरील ताबा सुटला. कार रस्त्यालगतच्या नालीवरील कठड्याला जोरदार धडकून पलटी झाली आणि बाजूच्या जागेत जाऊन पडली.
या भीषण अपघातात नयन लोंगाणी हे कारबाहेर फेकले गेले. त्यांच्या डोळ्याला व पाठीला दुखापत झाली, तर इतर पाच जण कारमध्ये अडकून पडले. अपघातानंतर त्यांनी तात्काळ हॉस्टेलचे सुरक्षा रक्षक व रेक्टर ज्योती भार्गवी यांना माहिती दिली.
घटनास्थळी स्थानिक नागरिक व पोलिसांनी धाव घेत गाडीत अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिकेद्वारे फलटण येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान चालक मोहम्मद हुसेन (अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम (जमशेदपूर, झारखंड) आणि सदानंद पुर्ती (जमशेदपूर, झारखंड) यांचा मृत्यू झाला. तर सौरभ कुमार (झारखंड), एम.डी. सितारे (बिहार) आणि नयन अमरजित लोंगाणी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
फिर्यादीच्या जबाबानुसार, चालक मोहम्मद हुसेन याने वाहन भरधाव वेगात चालविल्याने तसेच रस्त्याचा योग्य अंदाज न आल्याने कार कठड्याला धडकली. या निष्काळजीपणामुळे स्वतःसह अन्य दोन मित्रांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.