मुधोजी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष सप्ताहातील प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सौ. सरिता माने होत्या. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. नवनाथ रासकर, प्रा. डॉ. अनिल टिके, प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. डॉ. टी. पी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
“भारतीय समाज क्रांतीचे अग्रदूत : क्रांतीबा फुले” या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रभाकर पवार म्हणाले की, थॉमस पेन यांच्या “मानवी अधिकार” या ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुले यांच्या विचारांवर पडला होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शिक्षण प्रसार आणि समाजसुधारणेवर भर दिला. मुला-मुलींसाठी शाळा सुरू करून त्यांनी बहुजन समाजाला अज्ञान व गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्यांनी जीर्ण व अन्यायकारक प्रथांविरोधात आंदोलने केली आणि परिवर्तनवादी लेखनाद्वारे समाजात जागृती निर्माण केली. सत्यशोधक समाजाची स्थापना करून सार्वजनिक सत्यधर्माचा आग्रह धरला. त्यांच्या विचारांचा प्रभाव इतका व्यापक होता की, त्यातून हजारो कार्यकर्ते तयार झाले. राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा तसेच श्रीमंत मालोजीराजे यांनीही हा विचार विविध उपक्रमांद्वारे समाजात रुजविला.
शिक्षण, समाजसुधारणा आणि शेतकरी हिताच्या कार्याला त्यामुळे मोठे बळ मिळाले. आधुनिक विचारसरणी, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञानवादाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य क्रांतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. आजच्या समाजाने त्यांच्या कार्याचा वसा घेत शिक्षण, विज्ञान आणि सुधारक विचारांच्या माध्यमातून समाजव्यवस्था अधिक सक्षम करावी, असे आवाहनही प्रा. डॉ. पवार यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सौ. सरिता माने म्हणाल्या की, भारताला समाजसुधारणेची अत्यंत गरज असताना क्रांतीबा फुले यांनी शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व समाजास पटवून दिले. स्त्रियांच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्जबाजारीपणा, भोंदूगिरी आणि बुवाबाजी यांना आळा घालण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी व्यापक कार्य केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अंकुश खोब्रागडे यांनी केले