फलटण (प्रतिनिधी) – फलटण शहरात सध्या मटका, चक्री, गुटखा आणि अवैध दारू विक्रीने अक्षरशः उच्छाद मांडला असून, या अवैध धंद्यांमुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर ही गंभीर परिस्थिती मोठे आव्हान ठरत आहे.
शहरातील विविध भागांत खुलेआम मटका व चक्री सुरू असून, “ओपन-क्लोज”च्या नादात शहर झोपत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांकडे पोलिस यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. त्यामुळे “शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत आहेत की पैशांच्या नशेत?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त
आधीच बेरोजगारी आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मटका-चक्रीने आणखी खोल दरीत ढकलले आहे. अनेक जण घरातील वस्तू विकून किंवा खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन जुगार खेळत असल्याने, शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
नवी मंडई परिसरात खुलेआम व्यवहार
शहरातील नवी मंडई परिसरात नगरपालिकेच्या जागेतील काही गाळ्यांमध्ये खुलेआम मटका बुकिंग घेतले जात असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, अनेक पानपट्टी दुकानेही मटक्याचे अड्डे बनल्याचे दिसून येते. शहरासह ग्रामीण भागातून नागरिक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
अवैध धंद्यांना पोलिसांचा वरदहस्त..?
शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाही मटका, चक्री, जुगार, हातभट्टी दारू विक्री यांना उधाण आले आहे. याचबरोबर मोबाईल चोरी आणि भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांना पोलिसांचा मूक पाठिंबा असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
राजकीय संरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर
अवैध धंदे चालवणारे नेमके कोणाच्या पाठबळावर काम करतात ? ते कोणाचे कार्यकर्ते आहेत ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. काहींच्या फायद्यासाठी हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात राज्यकर्त्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.