आपला जिल्हा

फलटण तालुक्यात गॅसचा तुटवडा नाही ; मात्र बुकिंगशिवाय टाकी मिळणार नाही

(जावली /अजिंक्य आढाव ): शहरात गॅसचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरत असल्या तरी प्रत्यक्षात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, नियमांनुसार बुकिंग केल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला गॅस सिलिंडर (टाकी) देण्यात येणार नसल्याचे वितरकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे

 आंतरराष्ट्रीय तणाव आणि इंधन पुरवठ्यातील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर Ministry of Petroleum and Natural Gas ने देशातील एलपीजी पुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व तेल रिफायनरीजना अतिरिक्त एलपीजी उत्पादन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती ग्राहकांसाठी प्राधान्याने करण्यात येणार आहे.

मंत्रालयाने स्पष्ट केले की घरगुती एलपीजी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी २५ दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे एका सिलिंडरनंतर पुढील बुकिंगसाठी किमान २५ दिवसांचा कालावधी बंधनकारक असेल.

दरम्यान, रेस्टॉरंट, हॉटेल आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांसाठी एलपीजी पुरवठ्यावर कोणतीही अधिकृत बंदी नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्यक्षात काही वितरकांकडून व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक बिगर-घरगुती क्षेत्रांना आयात केलेल्या एलपीजीमधून प्राधान्याने पुरवठा केला जाणार आहे. तसेच इतर बिगर-घरगुती क्षेत्रांच्या मागणीचा आढावा घेण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMC) तीन कार्यकारी संचालकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रेस्टॉरंट, हॉटेल व इतर उद्योगांकडून आलेल्या निवेदनांचा विचार करून पुरवठ्याबाबत निर्णय घेणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी व्यावसायिक क्षेत्रासाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत

काही ग्राहक तातडीच्या कारणास्तव थेट एजन्सीकडे जाऊन सिलिंडरची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु शासनाच्या नियमानुसार आधी अधिकृत पद्धतीने बुकिंग करणे बंधनकारक आहे. बुकिंगनंतरच वितरण प्रक्रिया राबवली जाते.

वितरकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनावश्यक गर्दी टाळावी आणि ऑनलाईन, फोन किंवा अधिकृत अ‍ॅपद्वारे बुकिंग करूनच गॅस घ्यावा. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!