(फलटण/ प्रतिनिधी)नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. प्रचारसभांमध्ये भारतीय जनता पक्षांच्या वतीने प्रचार करताना ग्रामीण विकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमकपणे प्रचार करून आपलाच मित्र पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांवर व त्यांच्या नेत्यांवर जोरदार प्रहार करून जहरी टीका केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर विशेष करून दोन्ही मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघही जयकुमार गोरे यांनी टार्गेट केले होते.
त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान जयकुमार गोरे यांच्यात व मंत्री मकरंद पाटील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला निवडणुकीवेळी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या पक्षाचे तिकीट वाटप करताना कोणत्याही पक्षाला विचारपूस केली नव्हती. व मंत्री जयकुमार गोरे यांनी कसल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे या इरशेला लागले होते. मात्र ते स्वप्न ते सत्यात उतरू शकले नाही.
निकालानंतर स्पष्ट झाले की, भाजपा २८ राष्ट्रवादी २० शिवसेना १५ कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही.निवडणूक प्रचार दरम्यान जयकुमार गोरे यांनी केलेल्या जहरी टिके मुळे मंत्री शंभूराजे देसाई व मकरंद पाटील म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आणि तसेच सर्वसाधारण समीकरणही तयार होऊ लागले.आता आपल्याला सत्तेतून बाजूला ठेवले जात आहे असे जेव्हा भाजपाला वाटू लागले तेव्हा त्यांनी आता वरिष्ठ पातळीवरून जिल्ह्यात युती करण्यात यावी यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र या सर्व गोष्टी जनतेला किती पचली पडणार हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
अशावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित आले तर जिल्हा परिषदेची सत्ता या दोन्ही पक्षाकडे जाताना पहावयास मिळत आहे. आणि असेच समीकरण व्हावे अशी भावना पक्ष्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे.
मात्र भाजप शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित आल्यासया घडामोडींवर मतदारांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
“निवडणुकीच्या वेळी एकमेकांवर आरोप करायचे आणि निकाल लागल्यानंतर पुन्हा एकत्र यायचे, हे मतदारांची दिशाभूल आहे,” अशी प्रतिक्रिया एका मतदाराने व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता एका कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत त्याच्या मते “निवडणुकीत विरोध आणि निकालानंतर मैत्री, हे राजकारण समजणे कठीण आहे,” मग असेच राजकारण असेल तर आम्ही का निवडणुकीत टोकाचा विरोध करून भांडणे करायची.