(जावली/अजिंक्य आढाव ): मृग नक्षत्र सुरू होऊन दुसरा आठवडा उलटला तरी जावलीसह फलटण तालुक्यातील अनेक भागांत पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नाही. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस पडेल आणि खरीप हंगामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आठवडा संपत आला तरी पावसाचा एकही दमदार शिडकावा न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतांची मशागत, नांगरणी, वखरणी आणि इतर पूर्वतयारी पूर्ण केली आहे. अनेकांनी बियाणे व खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
फलटण तालुक्यातील जावली, बरड परिसरासह अनेक गावांमध्ये उन्हाचा कडाका कायम असून तापमानातही विशेष घट झालेली नाही. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली असली तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस केव्हा पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मृग नक्षत्रातील पहिला आठवडा कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून लवकरात लवकर पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.