(फलटण /प्रतिनिधी )– पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण येथील प्रांताधिकारी सौ.प्रियांका आंबेकर मॅडम यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त करत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव व जिल्हा समन्वयक विराज खराडे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले असून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक व्हावी, यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या ऐवजी इतर अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. फलटणच्या प्रांताधिकारी या भाजपाच्या पदाधिकारी असल्यासारख्या वागत आहेत व एकतर्फी निर्णय देत आहेत यापूर्वी त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय एकत्रित घेतले आहेत असा आरोप यापूर्वी अनेक वेळा प्रांत अधिकारी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यातच पंचायत समिती निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्या असून एकट्या शिवसेनेला देखील ८ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे पंचायत समिती सभापती पदाची निवड ही चिट्टीद्वारे होणार आहे. अशा या पार्श्वभूमीवर ही निवडणूक कोणत्याही वादाविना आणि सर्व सदस्यांच्या विश्वासाने पार पडणे गरजेचे आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रांताधिकाऱ्यांबाबत काही सदस्यांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हाप्रमुखांनी निवेदनात म्हटले आहे की, “निवडणूक प्रक्रियेबाबत कोणताही संशय किंवा वाद निर्माण होऊ नये, यासाठी निष्पक्ष व स्वतंत्र अधिकाऱ्याची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे.” त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांच्या ऐवजी इतर सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, पंचायत समिती सभापती पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून विविध गटांकडून रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्याच्या मागणीमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता जिल्हाधिकाऱ्यांकडून या निवेदनावर काय निर्णय घेतला जातो, याकडे फलटण तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.