(फलटण /प्रतिनिधी) – फलटण शहरामध्ये सध्या अनुचित घटनांची मालिका सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, काल नगरपरिषदेत घडलेल्या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे.
माहितीनुसार, फलटण नगरपरिषदेत कामानिमित्त आलेल्या एका तरुणाने तेथील महिला कर्मचाऱ्याशी अर्वाच्य भाषेत बोलत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे नगरपरिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित महिला कर्मचाऱ्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणात संबंधित तरुणावर तातडीने कायदेशीर कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, फक्त माफीनामा घेऊन प्रकरण मिटवण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी दबाव टाकल्याच्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे.
शहरात वाढत्या बेकायदेशीर धंद्यांबाबतही नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. काही ठिकाणी अवैध व्यवसायांवर कारवाई होत नसल्याबाबत पोलिस प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वारंवार तक्रारी करूनही छापे टाकले जात नाहीत किंवा कारवाई अपुरी राहते, अशी भावना व्यापारी व नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.
नगरपरिषदेत महिला कर्मचाऱ्यांनाच अशा प्रकारच्या शिवीगाळीला सामोरे जावे लागत असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून या घटनेची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठोस पावले उचलून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.