(जावली /अजिंक्य आढाव ): फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथील रहिवासी सौ. पल्लवी किशोर कदम यांना पंढरपूर येथे आयोजित ५ व्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात “राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सुलेखन (कॅलिग्राफी), डिझाईन आणि डेकोरेशन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोपाळपूर येथे २२ ते २४ मे दरम्यान पार पडलेल्या ५ व्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात राज्यभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. अक्षरकलेचे संवर्धन, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदितांना प्रेरणा देणे या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
संमेलनाध्यक्ष शुभम गायकवाड यांच्या हस्ते सौ. पल्लवी कदम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (आयपीएस), महसूल व वन विभागाचे उपसचिव संजय इंगळे, माजी न्यायाधीश योगेश पाटील, सभापती शुभम आगवणे यांच्यासह कला क्षेत्रातील ज्येष्ठ रांगोळीकार महादेव गोपाळे, अक्षर मित्र अमित भोरकडे, प्रशांत वाघमारे आणि ज्ञानेश्वर विजागत आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. पल्लवी कदम यांनी अक्षर सुलेखन, डिझायनिंग आणि सर्जनशील कलाक्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्याचा हा गौरव मानला जात आहे. त्यांच्या या यशामुळे मठाचीवाडी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.