खंडाळा, लोणंद, कोरेगाव, फलटणच्या औद्योगिक विस्तारासोबत जावली–बरडच्या बंद उद्योगाच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्नही महत्त्वा
(जावली/ अजिंक्य आढाव ): सातारा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रश्नांवर चर्चा केली. खंडाळा, लोणंद, कोरेगाव आणि फलटण येथील औद्योगिक क्षेत्रांचे विस्तारीकरण, नवीन औद्योगिक वसाहतींची स्थापना आणि भूसंपादनाच्या प्रश्नांसह आता फलटण तालुक्यातील जावली–बरड माळरानावरील तासगावकर इंडस्ट्रीज पुन्हा सुरू करण्याची मागणीही महत्त्वाची ठरत आहे.
सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा विचार करताना केवळ नवीन एमआयडीसी उभारण्याबरोबरच पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. जावली–बरड माळरानावरील तासगावकर इंडस्ट्रीज पुन्हा सुरू झाल्यास जावली, बरड तसेच परिसरातील ग्रामीण युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे या उद्योगाच्या पुनरुज्जीवनाचा विषयही उद्योगमंत्री स्तरावर मांडण्यात यावा, अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.
खंडाळा औद्योगिक क्षेत्राच्या तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे, लोणंद एमआयडीसीचा विस्तार, कोरेगाव तालुक्यातील तळवडे येथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करणे आणि फलटणच्या अतिरिक्त एमआयडीसीसाठी भूसंपादन पूर्ण करणे, असे महत्त्वाचे विषय रामराजे यांनी उद्योगमंत्र्यांसमोर मांडले आहेत. याशिवाय फलटण औद्योगिक क्षेत्रातील सी-१ भूखंडातून नांदल येथील शेतकऱ्यांना शेतीच्या वहिवाटीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या सर्व औद्योगिक मागण्यांच्या पार्श्वभूमीवर जावली–बरड माळरानावरील तासगावकर इंडस्ट्रीज पुन्हा सुरू करण्याचा विषयही जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या आराखड्यात समाविष्ट होणे आवश्यक आहे. नवीन उद्योगांची उभारणी आणि जुन्या उद्योगांचे पुनरुज्जीवन या दोन्ही माध्यमांतून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होऊ शकते.
एकीकडे नवीन एमआयडीसीचा विस्तार आणि दुसरीकडे बंद उद्योगांना नवसंजीवनी, असा सर्वसमावेशक औद्योगिक विकासाचा दृष्टिकोन स्वीकारल्यास फलटणच्या ग्रामीण भागालाही औद्योगिक विकासाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे तासगावकर इंडस्ट्रीज पुन्हा सुरू करण्याच्या मागणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा जावली–बरड परिसरातून व्यक्त होत आहे.