(फलटण/ प्रतिनिधी): येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) पंढरीनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) समन्वयक प्रो.(डॉ.) टी. पी. शिंदे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या एन.सी.सी विभागाच्या लेफ्टनंट सौ.लीना शिंदे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमारी मयुरी फडतरे हिने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी प्रास्ताविकेचे सामूहिक पठण करून त्यातील मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प केला. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बजावलेल्या ऐतिहासिक योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात मराठी विभागप्रमुख प्रो. (डॉ.) प्रभाकर पवार यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये प्रदान केली आहेत.
संविधानातील ही मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता ती आपल्या आचार-विचारांत आणि सामाजिक जीवनात रुजली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संविधान हे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असून देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे आणि अधिकारांचे संरक्षण करणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. सामाजिक न्याय, समान संधी, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी संविधानाचे विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गिरीश पवार यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व संविधानविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शेवटी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.