(जावली /अजिंक्य आढाव ): मौजे जावली (ता. फलटण) येथील पाणीपुरवठा सुरळीत करणे, तसेच जिल्हा परिषद शाळेतील देखभाल, स्वच्छता आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जावली गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावून ग्रामस्थांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची स्वच्छता, इमारतीची देखभाल आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागण्यांवर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तातडीने कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत जावली कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.