(जावली/ अजिंक्य आढाव ): भारतीय संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे (बरड), जिल्हा परिषद सदस्य श्री. गिरीश बनकर (तरडगाव), जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योती गौतम मोरे (विडणी), माजी सरपंच श्री. गौतम मोरे, श्री. धीरज चव्हाण, श्री. अमोल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचा भक्कम पाया असून प्रत्येक नागरिकाला समान हक्क, न्याय आणि स्वातंत्र्य देणारे संविधान आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवणेही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा समाजात प्रसार व्हावा, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
शिवसेना राजे गटाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश दिला.