(जावली/ अजिंक्य आढाव ): एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते; मात्र काळ बदलत असतानाही त्यामागचा विचार आणि सामाजिक बांधिलकी तब्बल २६ वर्षे अखंड जिवंत ठेवणे, हे खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचे कार्य आहे. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानने संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञान, विचार आणि प्रबोधनाची अखंड चळवळ उभी केली असून, ही परंपरा केवळ दुधेबावीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे, असे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी काढले.
दुधेबावी (ता. फलटण) येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित दुधेबावी फेस्टिव्हलअंतर्गत संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनकरराव सोनवलकर, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी बारामतीचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव डांगे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे, तिरकवाडीचे माजी उपसरपंच महेश सोनवलकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस, संपतराव आडके आणि ग्रामपंचायत अधिकारी गणेश एकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुल गावडे म्हणाले की, समाजाचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि भौतिक सुविधांच्या उभारणीतून होत नाही, तर समाजाची वैचारिक जडणघडण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानने गावाच्या विकासाबरोबरच समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अशा उपक्रमांसाठी वेळ, श्रम आणि पैसा खर्च करावा लागतो; मात्र त्यातून घडणारी विचारांची पेरणी आणि समाजमनावर होणारे सकारात्मक संस्कार अधिक मोलाचे आहेत.
संत गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांनी केवळ भाषणातून उपदेश केला नाही, तर स्वतःच्या कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला. स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही त्यांनी दिलेली मूल्ये आजही समाजाला मार्गदर्शक आहेत. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले, तर त्यातून आत्मिक समाधान मिळते.
अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणे आणि शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हा गाडगेबाबांच्या विचारांचा गाभा होता. प्रतिष्ठानने याच विचारांचा वारसा व्याख्यानमालेच्या माध्यमातून पुढे नेला आहे. महाराष्ट्रात नावाजली जाणारी ही व्याख्यानमाला ग्रामीण भागातील वैचारिक चळवळीचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचेही राहुल गावडे यांनी नमूद केले.
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनकरराव सोनवलकर म्हणाले की, व्याख्यानमालेतून नामवंत व्याख्याते, अनुभवी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी ग्रामीण भागातील नागरिक आणि युवकांना मिळते. त्यामुळे युवकांच्या विचारांना दिशा मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत आहे. व्याख्यानमालेबरोबरच सर्वरोग निदान शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध समाजोपयोगी उपक्रम प्रतिष्ठान राबवत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर आणि खजिनदार डॉ. युवराज एकळ यांनी केले, तर सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी आभार मानले.
यावेळी दुधेबावीचे माजी सरपंच भाऊसाहेब मोरे, उपसरपंच तानाजी नाळे, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दादासाहेब पवार, सोसायटीचे चेअरमन सचिन सोनवलकर, सुमित नाळे, भानुदास सोनवलकर, फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, माजी उपसरपंच अविनाश चांगण, अण्णासाहेब भुंजे, सर्जेराव सोनवलकर, दुधेबावी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड, क्रीडा समितीचे अध्यक्ष कांता सोनवलकर, भीमराव नाळे, पोपटराव सोनवलकर, उद्योजक राजेंद्र नाळे, किरण नाळे, वृक्षमित्र सचिन सोनवलकर, संदीप ठोंबरे, सौरभ एकळ, कृषिमित्र संजय सोनवलकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.