एमपीएससी–यूपीएससी यशस्वीतांचा दुधेबावी फेस्टिव्हलमध्ये सन्मान; संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या कार्याचा गौरव
(जावली/ अजिंक्य आढाव ): ग्रामीण भागात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित ठेवणे ही केवळ शैक्षणिक बाब नसून समाजपरिवर्तनाची चळवळ आहे. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानने गेली २६ वर्षे संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या माध्यमातून गावातील तरुणांना विचार, दिशा आणि प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे गौरवोद्गार पुण्याचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी काढले.
दुधेबावी फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित एमपीएससी–यूपीएससी परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांच्या सन्मान समारंभात ते बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. वाघमोडे म्हणाले की, गावाच्या विकासाबरोबरच सामाजिक परिवर्तनाची चळवळ सातत्याने जिवंत ठेवण्याचे काम दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानने केले आहे. अशा उपक्रमांसाठी वेळ आणि पैसा खर्च होत असला, तरी त्यातून घडणारे समाजप्रबोधन आणि सकारात्मक बदल अधिक मोलाचे आहेत.
संत गाडगेबाबा हे केवळ उपदेश करणारे नव्हते, तर स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणारे ‘चालते-बोलते विद्यापीठ’ होते. श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही त्यांनी दिलेली मूल्ये आजही समाजासाठी तितकीच महत्त्वाची आहेत. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. प्रत्येक काम प्रामाणिकपणे केल्यास त्यातून आत्मिक समाधान मिळते, असा संदेशही त्यांनी युवकांना दिला.
शिक्षणापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा संत गाडगेबाबांचा मूळ विचार होता. याच विचारातून दुधेबावी प्रतिष्ठानचे कार्य सुरू असून, प्रतिष्ठानची संत गाडगेबाबा व्याख्यानमाला आज महाराष्ट्रात नावाजली जात आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून नामवंत व्याख्याते, अनुभवी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील तरुणांना मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिग्विजय सोनवलकर यांनी व्याख्यानमालेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, आम्ही शाळेत असल्यापासून या व्याख्यानमालेचा अनुभव घेत आलो आहोत. विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा देण्याचे काम ही व्याख्यानमाला करत आहे. व्याख्यानमालेबरोबरच प्रतिष्ठानकडून सर्वरोग निदान शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच एमपीएससी–यूपीएससी परीक्षांसाठी मार्गदर्शन असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, आरोग्यसेवा आणि समाजप्रबोधन अशा तिन्ही स्तरांवर संधी उपलब्ध करून देणारे प्रतिष्ठानचे कार्य निश्चितच उपयुक्त आणि दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर आणि खजिनदार डॉ. युवराज एकळ यांनी केले, तर सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी आभार मानले.
यावेळी एमएसईबी बारामतीचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस, ग्रामपंचायत अधिकारी गणेश एकळ, दुधेबावीचे माजी सरपंच भाऊसाहेब मोरे, सोसायटीचे चेअरमन सचिन सोनवलकर, संपतराव आडके सर, भानुदास सोनवलकर, फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, माजी उपसरपंच अविनाश चांगण, अण्णासाहेब भुंजे, सर्जेराव सोनवलकर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड, कांता सोनवलकर, भीमराव नाळे, पोपटराव सोनवलकर, उद्योजक राजेंद्र नाळे, किरण नाळे, वृक्षमित्र सचिन सोनवलकर, संदीप ठोंबरे, सौरभ एकळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.