(विडणी /सतीश कर्वे )विडणी ता. फलटण येथील काजल जगताप यांच्या आई मोलमजुरी करते, वडील गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात… घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि अनेक संकटांवर जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमांच्या जोरावर मात करत विडणी (जगतापवस्ती) येथील काजल अर्जुन जगताप हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिची मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली असून, तिच्या या यशाने विडणीसह फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
काजल जगताप हिची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. वडील गवंडी काम करून तर आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. आई-वडिलांचे कष्ट आणि घरची आर्थिक परिस्थिती यांची जाणीव काजलने कायम मनात ठेवली. याच परिस्थितीवर मात करून काहीतरी मोठे साध्य करण्याची जिद्द तिने मनाशी बाळगली.
काजलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, विडणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी येथे पूर्ण केल्यानंतर फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सन २०२२ पासून विडणी ग्रामपंचायतीच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.
या प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चार वेळा परीक्षा देऊनही अपेक्षित यश मिळत नव्हते. पीएसआय आणि एसटीआय परीक्षांमध्ये अगदी थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. मात्र, अपयशाने खचून न जाता तिने अधिक जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील परीक्षेच्या निकालात तिने यश मिळवत मंत्रालय सहाय्यकपदाला गवसणी घातली.
कष्टकरी आई-वडिलांच्या त्यागाचे चीज करणाऱ्या काजलच्या यशाचे विडणी परिसरात विशेष कौतुक होत आहे. तिच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कष्टकरी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद!