अवैध दारू विक्रीविरोधात फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; तिघांवर गुन्हे दाखल गुणवरे, निंभोरे, साखरवाडी येथे छापे ; २ हजार ४०० रुपयांचा देशी दारूसाठा जप्त
(जावली/ अजिंक्य आढाव ): फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुणवरे, निंभोरे आणि साखरवाडी येथील फुलेनगर परिसरात छापे टाकून अवैधरीत्या देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण २ हजार ४०० रुपये किमतीचा देशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित गावांमध्ये छापे टाकले. यावेळी राजू शिवाजी चांगण (वय ४७, रा. गुणवरे), विजय बापू कांबळे (वय ६५, रा. निंभोरे) आणि दत्तात्रय हनुमंत पवार (वय ४२, रा. फुलेनगर, साखरवाडी) हे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करताना आढळून आले.
पोलिसांनी राजू चांगण याच्याकडून १८० मिलीच्या १० सीलबंद बाटल्या, विजय कांबळे याच्याकडून १८० मिलीच्या १० सीलबंद बाटल्या, तर दत्तात्रय पवार याच्याकडून ९० मिलीच्या २० सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या तिन्ही कारवायांमध्ये एकूण २ हजार ४०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८०/२०२६, ६८१/२०२६ आणि ६८२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल किरण अभंग आणि पोलीस हवालदार संजय अडसूळ यांनी केली. तर पुढील तपास पोलीस हवालदार अभंग, पवार आणि पिसे करीत आहेत.अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.