(फलटण /प्रतिनिधी ) पदाची इच्छा तरुणांच पण पद कार्यकर्त्याला मिळावं, ही बाळराजेंची भावना ! स्वतः पद मिळवण्यापेक्षा कार्यकर्त्यांना संधी देण्याला प्राधान्य देणार असल्या चे बोलत होते.शिवसेनेचा सातारा जिल्ह्यात तळागाळापर्यंत विस्तार करण्याची इच्छा व्यक्त बाळराजे यांच्यासोबत गप्पा मारताना त्यांच्यात निर्माण झालेली राजकीय परिपक्वता, कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता आणि संघटनात्मक बांधिलकी पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली.
एका दौऱ्यादरम्यान पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य निवडीचा विषय निघाला. त्यावेळी तरुण कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा होती की, बाळराजे यांनी स्वतः स्वीकृत सदस्य व्हावे. आपल्या नेतृत्वाला एखाद्या पदावर पाहण्याची कार्यकर्त्यांची ही भावना त्यांच्या प्रेमातून आणि विश्वासातून निर्माण झालेली होती.
मात्र, त्यावेळी बाळराजे यांनी मांडलेले विचार ऐकून मन खरोखर भारावून गेले.
ते म्हणाले, “पद हे आपण आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना दिले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःच मन दाखवायचे नसते. लोकांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते माझ्यासाठी मागणी करतात; पण माझ्यासाठी पदापेक्षा माणसं प्रिय आहेत.”
तरुण कार्यकर्त्यांना आपला नेता पदावर असावा असे वाटत असताना, त्या नेत्याला मात्र आपण पदावर जाण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्याला त्या पदाची संधी मिळावी, असे वाटत होते. हा विचारच मनाला स्पर्श करून गेला.
याच संवादात त्यांनी शिवसेना पक्षाविषयीची आपली भूमिका देखील स्पष्ट केली. ज्या शिवसेना पक्षाने अडचणीच्या काळात आपल्याला साथ दिली, त्या पक्षाचा सातारा जिल्ह्यात तळागाळापर्यंत विस्तार करण्याची संधी मिळाली, तर ती संधी आपण आनंदाने स्वीकारू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“मला पक्षाचे काम करण्यासाठी मोकळीक हवी आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि शिवसेनेचा विचार गावागावांत पोहोचवण्यासाठी काम करण्याची माझी तयारी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील ज्या वाईट प्रवृत्तींमुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, अशा प्रवृत्तींना संघटितपणे तोंड देणे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे आपण महत्त्वाचे मानतो, असेही त्यांनी बोलून दाखवले.
आजच्या राजकारणात पदासाठी होणारी धडपड, स्पर्धा आणि चढाओढ पाहता स्वतःसाठी आलेली संधी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सोडण्याची भावना खरोखर दुर्मिळ आहे. कार्यकर्ते नेत्यासाठी जीवाचे रान करतात, निष्ठेने उभे राहतात, संघर्षात साथ देतात. त्यांच्या या निष्ठेची जाणीव ठेवून त्यांना संधी देणे, हीच मोठ्या मनाच्या नेतृत्वाची ओळख आहे.”पद नसलं तरी मला काही फरक पडत नाही. लोकांची सेवा करायला, लोकांमध्ये मिसळायला कोणतं पद लागत नाही.”तरुणांना आपल्या नेत्याला पदावर पाहायचे होते… पण नेत्याला आपल्या कार्यकर्त्याला पदावर पाहायचे होते!
यापेक्षा नेतृत्वाचा मोठेपणा आणखी काय असू शकतो.?
पद माणसाला ओळख देतं; पण माणसांवरचं प्रेम नेतृत्वाला उंची देतं. पदं येतील, जातील; मात्र आपल्या माणसांसाठी मनात जपलेली भावना आणि त्यांच्या प्रगतीसाठी घेतलेली भूमिका कायम स्मरणात राहते.
बाळराजेंच्या त्या सहज बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली…
स्वतः पद मिळवणं हे मोठेपणाचं लक्षण नाही, तर आपल्यासाठी पदाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या पदावर बसवणं, हे खरं नेतृत्वाचं मोठेपण आहे!
आणि पक्षाने दिलेल्या साथ-सहकार्याची जाणीव ठेवून त्याच पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी स्वतःला झोकून देण्याची तयारी, ही त्यांच्या राजकीय निष्ठेची वेगळी ओळख म्हणावी लागेल.