(फलटण /प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील जावली येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या जावली जोडी मॅरेथॉन २०२६ स्पर्धेत फलटण रनर्स फाउंडेशनच्या धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत फलटणचा नावलौकिक उंचावला आहे. या स्पर्धेत फलटणच्या तीन जोड्यांनी विविध वयोगटांत यश संपादन करत घवघवीत कामगिरी केली. विशेष म्हणजे या स्पर्धेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, अशा ऐतिहासिक स्पर्धेत फलटणच्या धावपटूंनी मिळवलेले यश फलटणकरांसाठी अभिमानास्पद ठरले आहे.
या स्पर्धेत फलटण रनर्स फाउंडेशनच्या धावपटूंनी पुढीलप्रमाणे यश मिळवले.
३५ ते ४५ वयोगट
– संदेश गायकवाड आणि आशिष तरडे – प्रथम क्रमांक.
४६ ते ५५ वयोगट
– माणिक कांबळे आणि बाळासाहेब शिंगाडे – द्वितीय क्रमांक. – संतोषकुमार बरकडे आणि मारुती चोरमाले – तृतीय क्रमांक.
या यशामागे फलटण रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच फाउंडेशनचे सदस्य प्रवीण घोरपडे, अमित माने, नानासाहेब काळुखे यांच्यासह इतर सहकाऱ्यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि शुभेच्छांचाही मोलाचा वाटा राहिला.
धावण्याचा छंद, सातत्यपूर्ण सराव, शिस्त, जिद्द आणि सांघिक भावना यांच्या जोरावर फलटण रनर्स फाउंडेशनने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडाप्रेमी, धावपटू आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विजेत्या जोड्यांचे विशेष कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तीन जोड्यांच्या या यशामुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्व यशस्वी धावपटूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.