दीपक भाऊ बोऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मंथन; सकल धनगर समाजाला एकजुटीचे आवाहन
(सांगली / प्रतिनिधी) धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने सांगली येथे शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
धनगर समाजाचे नेते, आरक्षण संघर्षनायक तथा मल्हार योद्धा दीपक भाऊ बोऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी जालना येथे आमरण उपोषण, विविध आंदोलने, राज्यभर दौरे, महामोर्चे आणि समाजजागृतीच्या माध्यमातून सातत्याने भूमिका मांडली आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, केवळ आश्वासनांवर न थांबता आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी समाजाची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील विविध संघटना, पदाधिकारी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
राजकीय मतभेद, गट-तट बाजूला ठेवून समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीस सांगली जिल्ह्यासह परिसरातील सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी म्हटले आहे.
बैठकीचा तपशील :
दिनांक : शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
वेळ : दुपारी २ वाजता
स्थळ : हॉटेल सीझन फोर, सांगली-मिरज रोड, सांगली
प्रमुख उपस्थिती : दीपक भाऊ बोऱ्हाडे (मल्हार योद्धा तथा धनगर आरक्षण संघर्षनायक)
धनगर समाजाचा एस.टी. आरक्षणाचा लढा हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून संपूर्ण समाजाच्या भवितव्याशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे समाजाच्या हक्कासाठी एकजुटीने उभे राहून या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सकल धनगर जमात, सांगली यांच्या वतीने करण्यात आले आहे.