(फलटण/ प्रतिनिधी ): फलटण शहरातील बालाजी स्वीट आणि गाणबोटे मिल्क यांच्याविरोधात निकृष्ट दर्जाचा खवा विक्री केल्याप्रकरणी संबंधित प्रशासनाने संयुक्त कारवाई करत दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी आदेशानुसार दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रकरणात केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून संबंधित दुकानांवर कठोर कारवाई करून ती बंद करण्यात यावीत, अशी मागणी आता फलटणकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
फलटण शहरातील या स्वीट होमबाबत यापूर्वीही ग्राहकांकडून विविध तक्रारी करण्यात आल्याचे समोर येत आहे. या दुकानांमध्ये मिठाई व इतर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते; मात्र प्रत्यक्ष उत्पादन अन्य ठिकाणी केले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मिठाई व खाद्यपदार्थ तयार केले जातात, त्या उत्पादन केंद्रांची स्वच्छता, अन्नसुरक्षा मानके तसेच आवश्यक परवाने आणि नियमांचे पालन केले जाते की नाही, याचीही संबंधित विभागाने सखोल तपासणी करणे गरजेचे आहे.
खवा हा बहुतांश पारंपरिक मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. अशा परिस्थितीत खव्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळल्यास त्यापासून तयार होणाऱ्या मिठाईच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या घटनेमुळे ग्राहकांच्या मनात मिठाई व इतर खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाऊ नये. अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ दंड आकारून थांबू नये, तर उत्पादन केंद्रे, साठवणूक व्यवस्था, स्वच्छता आणि विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता यांची नियमित व सखोल तपासणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, फलटण शहरात महाराष्ट्रातील नामांकित मिठाई विक्रेत्यांनीही आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरू केला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या मिठाईची गुणवत्ता, उत्पादनाची माहिती, साठवणूक आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन यांचीही संबंधित अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचा धोका अधिक गंभीर ठरू शकतो. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांनी ग्राहकांना पदार्थांचा दर्जा, उत्पादनाची माहिती आणि स्वच्छतेबाबत विश्वासार्ह माहिती देणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला प्रशासनाने पाठीशी घालू नये. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास नियमानुसार विक्री परवाना निलंबित किंवा रद्द करण्यासह आवश्यक कारवाई करावी, अशी ठाम मागणी फलटणकर नागरिकांकडून होत आहे.