(फलटण | प्रतिनिधी)पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या या यशामुळे सातारा, पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. साताऱ्याचे माहेर, पुण्याचे सासर आणि ब्रिटनमध्ये उच्चशिक्षण अशी ओळख असलेल्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्या राजकीय प्रवासाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
हर्षदा देशमुख-जाधव या माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत. प्रभाकर देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निकटचा राजकीय संबंध राहिला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत भाजपचे जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध त्यांना ८८ हजार ४२६ मते मिळाली होती; मात्र त्यांचा ३ हजार ४६ मतांनी पराभव झाला होता. आता त्यांच्या कन्येच्या राजकीय यशामुळे देशमुख कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे.
अभियांत्रिकीपासून ब्रिटनमधील उच्चशिक्षणापर्यंत
हर्षदा देशमुख-जाधव यांची शैक्षणिक कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्यांनी पुण्यातील व्हीआयटी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एम.ई.चे शिक्षण पूर्ण केले. ब्रिटनमधील क्रॅनफिल्ड विद्यापीठातून त्यांनी फायनान्स अँड मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
शिक्षणासोबतच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील व्यवस्थापनाचा अनुभवही मिळवला आहे. पुण्यातील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी ग्रुपमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. उच्चशिक्षण, व्यवस्थापन कौशल्य आणि राजकीय पार्श्वभूमी यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
पश्चिम महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे नाते
पंढरपूर येथे जन्म, सांगलीतील आजोळ, कोल्हापुरातील शिक्षण, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील लोधवडे हे माहेर आणि पुणे हे सासर अशा विविध भागांशी हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाते जोडले गेले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांशी त्यांचा कौटुंबिक आणि सामाजिक संपर्क राहिला आहे.
पदवीधर मतदारांचे प्रश्न, उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मुद्दे यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या विजयामुळे विधान परिषदेत महिलांचे प्रतिनिधित्व आणि उच्चशिक्षित नेतृत्व या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
साताऱ्याच्या मातीतून घडलेले नेतृत्व, ब्रिटनमधील उच्चशिक्षणाची शिदोरी आणि राजकीय मैदानातील यश यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांचा प्रवास पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.