(जावली /अजिंक्य आढाव) : टेलस ऑर्गनायझेशन, पुणे यांच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रोजेक्टर भेट देण्यात आला. क्रीडा शिक्षक आप्पासाहेब वाघमोडे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि प्लास्टिकमुक्त शाळेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
टेलस ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट, विश्वास घावटे, सतेज पाषाणकर, राहुल बावडेकर आणि हनू प्रसाद डांगी यांच्या सहकार्याने शाळेला प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्यात आला.
यावेळी लोकेश बापट यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि शिक्षणासोबत सामाजिक भानही जपावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळून परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
यापूर्वी टेलस ऑर्गनायझेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना २०० स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाचा आढावा घेताना विद्यार्थी नियमितपणे स्टीलच्या बाटल्यांचा वापर करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या कार्यक्रमास युथ असोसिएशनचे चेअरमन शत्रुघ्न बेलदार, संचालिका कांचनताई पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अनिल खलाटे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार आप्पासाहेब वाघमोडे यांनी मानले.