(सोलापूर/प्रतिनिधी ): राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सुमारे 92लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून ही मदत दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे पंचनामे करतानाच त्यांचे अॅग्रीस्टॅक क्रमांक आणि बँक खात्याची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे मदतीची रक्कम मिळण्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
चार नोव्हेंबरपूर्वी मदत मिळण्याची शक्यता
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर केंद्राच्या आपत्ती निवारण निधीतून (एनडीआरएफ) मिळणाऱ्या मदतीद्वारे उर्वरित नुकसानभरपाई वितरित केली जाणार आहे. सध्या शासनाने प्रत्येक विभागाच्या निधीतून 20 टक्के रक्कम राखीव ठेवली असून, या निधीचा वापर दुष्काळी परिस्थितीत मदत आणि निवारणासाठी केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर या मदतीबाबत घोषणा करण्यात आली असून, संबंधित शासन निर्णय पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
या निर्णयामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष मदतीचे वितरण शासन निर्णय, पात्र लाभार्थ्यांची यादी आणि निधी उपलब्धतेनुसार होणार आहे.