युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर अध्यक्षपदी; विविध वयोगटांतील खेळाडूंना प्रशिक्षण व स्पर्धांची संधी
(फलटण / प्रतिनिधी): कुस्ती, खो-खो, कबड्डी यांसारख्या देशी खेळांची समृद्ध परंपरा जपणाऱ्या फलटणच्या क्रीडा क्षेत्रात आता क्रिकेटच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू होत आहे. शहर व तालुक्यातील गुणवंत क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठ, दर्जेदार मार्गदर्शन आणि सरावाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फलटण तालुका क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून तालुक्यातील नवोदित क्रिकेटपटूंना घडवून त्यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
फलटण शहर व तालुक्यात क्रिकेट खेळणाऱ्या अनेक खेळाडूंमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक संधींची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन, नियमित सराव आणि विविध स्पर्धांमधील सहभाग यावर विशेष भर दिला जाणार आहे.
पाच वयोगटांतील खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी
असोसिएशनच्या माध्यमातून १२, १४, १६, १९ आणि २३ वर्षांखालील वयोगटांतील खेळाडूंना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निवड चाचणी स्पर्धांच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांचे संघ तयार करण्यात येणार आहेत. या संघांना तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील तसेच शहरातील होतकरू खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील प्रतिभेला योग्य दिशा मिळावी आणि फलटणमधून दर्जेदार क्रिकेटपटू घडावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड
फलटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी शिवराज सत्वशील नाईक निंबाळकर (फलटण), सचिवपदी अशोक माधव गाडगीळ (पुणे), तर खजिनदारपदी दशरथ बुवासाहेब नाईक निंबाळकर (पुणे) यांची निवड झाली आहे.
तसेच विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी अविनाश जीवन कांबळे (निरगुडी), अभिजीत प्रकाश गोडसे (गारपीरवाडी) आणि ॲड. ऋतुराज वीरसेन कदम (फलटण) यांची निवड करण्यात आली आहे.
क्रिकेट क्षेत्रात फलटणचा नावलौकिक वाढविण्याचा निर्धार फलटणची ओळख पारंपरिक देशी खेळांची पंढरी म्हणून आहे. या क्रीडा परंपरेला आधुनिक क्रिकेटची जोड देत आगामी काळात फलटणचा नावलौकिक देश-विदेशात वाढविण्याचा असोसिएशनचा मानस आहे. नव्या पिढीतील खेळाडूंना घडविण्याबरोबरच जुन्या आणि अनुभवी क्रिकेटपटूंनाही प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, ज्येष्ठ क्रिकेटपटू आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या स्थापनेचे स्वागत करून गुणवंत क्रिकेटपटू घडविण्याच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
फलटणच्या समृद्ध क्रीडा परंपरेत क्रिकेटची भर घालत नवोदित खेळाडूंना प्रगतीची नवी दिशा देणारा हा उपक्रम भविष्यात तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.