(फलटण | प्रतिनिधी)विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात ‘मानसिक आरोग्य : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. फलटण येथील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. राजश्री नाळे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, ताणतणाव, नकारात्मक विचार आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजश्री नाळे यांनी विद्यार्थ्यांना काही तंत्रांचे प्रशिक्षण देतानाच प्राणिक हिलिंग तंत्राचे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट केले.
मार्गदर्शन करताना डॉ. नाळे म्हणाल्या की, दिवसभर आपल्या मनात असंख्य विचार येत असतात. त्यातील मोजकेच विचार महत्त्वाचे असतात; मात्र अनावश्यक विचारांनी मन व्यापले की ताणतणाव निर्माण होतो. बाहेर युद्ध सुरू असते, त्याचप्रमाणे आपल्या मनातही विचारांचे एक प्रकारचे युद्ध सुरू असते. भीती, त्रास, राग, कंटाळा, संभ्रम आणि नैराश्य यामुळे व्यक्ती नकारात्मक कृतींकडे वळू शकते. काळजी आणि नैराश्य ही आत्महत्येमागील प्रमुख कारणे आहेत, त्यामुळे मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रत्येक गोष्ट आपण आनंदासाठी करतो आणि केली पाहिजे. त्यासाठी मनातील अनावश्यक गोष्टी दूर केल्या पाहिजेत,” असे सांगत त्यांनी मोबाईलच्या अतिवापराबाबतही विद्यार्थ्यांना सावध केले. मोबाईलचे व्यसन मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. त्यामुळे दैनंदिन जीवनात शिस्त आणि स्वतःवर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. “आपल्याला कळते; पण वळत नाही, अशी आपली अवस्था होते,” असे त्यांनी नमूद केले.
नियमित चालणे, व्यायाम, योग्य झोप आणि सकाळी लवकर उठण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. चालण्यामुळे शरीरात आवश्यक हार्मोन्स तयार होण्यास मदत होते, भावनिक नियंत्रण सुधारते आणि रात्री चांगली झोप लागते. “आपल्या मेंदूला आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. आपल्या आयुष्याचा पासवर्ड आपल्या हातात आणि जवळ असला पाहिजे,” असे सांगत विचार व भावनांवर नियंत्रण, जीवनाचे ध्येय निश्चित करणे, नाती व मैत्री दृढ करणे आणि स्वतःचा आदर करणे या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई येथील समुपदेशक विभा चुरी यांनीही विद्यार्थ्यांना मन व भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले. संगीत, मैत्री, चालणे आणि व्यायाम या गोष्टी दैनंदिन जीवनाचा भाग बनवाव्यात तसेच नकारात्मक विचारांपासून दूर राहावे, असे त्यांनी सांगितले. “शरीराला जसे औषधाची गरज असते, तसेच भरकटलेल्या आणि संभ्रमात असलेल्या मनालाही समुपदेशनासारख्या उपायांची आवश्यकता असते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कला शाखेच्या प्रमुख डॉ. सरिता माने आणि विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. मोना पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय समुपदेशन केंद्राचे समन्वयक डॉ. नवनाथ रासकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शैला शिरसागर यांनी केले, तर आभार डॉ. गौरी गायकवाड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच कला व विज्ञान शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.