(फलटण /प्रतिनिधी): दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या विद्यमाने बंदी असलेल्या चायना मांजाच्या वापराविरोधात जनजागृती करण्यासाठी विशेष प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मुधोजी क्लब, महात्मा फुले चौक, फलटण येथून या प्रभातफेरीला सुरुवात होणार आहे.
या उपक्रमाचे सहआयोजक म्हणून सहयोग सोशल फाउंडेशन सहभागी झाले असून, फलटण शहर व तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नागपंचमी व पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चायना मांजा किंवा नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होणे, मृत्युमुखी पडणे तसेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याच्या घटना घडतात. हा मांजा पर्यावरणासाठीही घातक असून, त्याचा वापर, विक्री व साठवणुकीविरोधात शासनाच्या निर्देशांनुसार कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे बंदी असलेल्या चायना मांजाचा वापर व विक्री पूर्णपणे थांबविण्यासाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचा उद्देश या प्रभातफेरीमागे आहे.
याचबरोबर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सहयोग सोशल फाउंडेशनच्या वतीने १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी ‘महारक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांनी या रक्तदान उपक्रमातही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभातफेरीसोबतच दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चायना मांजाविरोधी जनजागृती, वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. फलटण शहरातील विविध भागांमध्ये या विषयांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, बंदी असलेल्या चायना मांजाची विक्री व वापर रोखण्यासाठी संबंधित शासकीय विभागांना निवेदने देण्यात आली असून, या प्रकरणी प्रभावी अंमलबजावणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आयोजकांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, “पतंगोत्सव हा आनंदाचा असावा; मात्र तो पक्षी, वन्यजीव किंवा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा नसावा. पारंपरिक व पर्यावरणपूरक धाग्याचा वापर करून पतंगोत्सव साजरा करावा.”
तसेच पतंगोत्सवानंतर रस्त्यावर, झाडांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी चायना अथवा नायलॉन मांजा आढळल्यास तो उघड्या हाताने न हाताळता योग्य सुरक्षित साधनांचा वापर करून काळजीपूर्वक गोळा करावा आणि त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
चायना मांजामुक्त फलटण, पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा आणि सुरक्षित पतंगोत्सव साजरा करा, या संदेशासह नागरिकांनी प्रभातफेरी, महारक्तदान शिबिर आणि इतर सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण व सहयोग सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.