फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश ; जावलीचाही समावेश
(जावली/ अजिंक्य आढाव ): फलटण तालुक्यातील मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेता न आलेल्या ८० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत प्रशासक नियुक्ती आदेश काढला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन (भा.प्र.से.) यांनी यापूर्वीचे संबंधित प्रशासक नियुक्ती आदेश रद्द करून नव्याने नियुक्त्या केल्या आहेत.
फलटण तालुक्यातील फेब्रुवारी २०२६ अखेर मुदत संपलेल्या ८० ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच इतर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या यादीमध्ये जावली ग्रामपंचायतीचाही समावेश असून, जावलीसाठी श्री. एम. के. चितळकर, विस्तार अधिकारी (कृषी) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच साखरवाडी (पिंपळवाडी), तांबवे, कोळकी, पिराचीवाडी, खुंटे, भिलकटी, जाधववाडी, अलगुडेवाडी, सोनवडी खु., तिरकवाडी, सासकल, नांदल, मिरढे यांसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचा आदेशातील यादीत समावेश आहे.
या प्रशासक नियुक्तीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज नियमितपणे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.