(बारामती/प्रतिनिधी) : दिशा फाउंडेशन, बारामती-पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६ यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा, मुर्टी-मोढवे (ता. बारामती, जि. पुणे) येथील तंत्रस्नेही, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. विशाल बाळासो गावडे यांना प्रदान करण्यात आला.
बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित भव्य समारंभात दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब भोसले, माधव जोशी, चंदूकाका पतपेढीचे सर्वेसर्वा किशोरकुमार शहा, सिद्धीत शहा, बारामती इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, माजी सभापती समीर चव्हाण तसेच बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक अविनाश निकाळजे यांच्या हस्ते श्री.विशाल बाळासो गावडे यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
राज्यभरातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. विशाल गावडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नाविन्यपूर्ण राबवित असलेले उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्री. गावडे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून जबाबदारी वाढविणारा आहे.
हा गौरव माझ्या विद्यार्थ्यांना, सहकारी शिक्षकांना, पालकांना आणि माझ्या आई-वडिलांना समर्पित आहे. यापुढेही अधिक समर्पणाने आणि निष्ठेने शिक्षणसेवा करत राहीन.”या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांकडून, मित्रपरिवाराकडून तसेच संस्था अध्यक्ष आकाश दादा मोरे अभिनंदन केले.