(जावली /अजिंक्य आढाव ): फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मुधोजी महाविद्यालयात शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले – एक युगपुरुष’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या IQAC अंतर्गत प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी तसेच तिन्ही भाषा वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील प्रा. डॉ. राजकुमार कदम यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम होते.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. राजकुमार कदम म्हणाले, “प्राचार्य शिवाजीराव भोसले हे केवळ विख्यात वक्ते आणि विचारवंत नव्हते, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संतत्वही होते. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीला साजेसे त्यांचे आचरण होते. फलटण ही वक्तृत्वाची पंढरी आणि त्या पंढरीतील पांडुरंग म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्राचार्य भोसले यांनी फलटण, पुणे येथील वसंत व्याख्यानमालेपासून कॅलिफोर्निया व शिकागोपर्यंत आपल्या प्रभावी वक्तृत्वाची छाप पाडली. तब्बल पाच दशके त्यांनी आपल्या वाणीने संपूर्ण मराठी मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या वक्तृत्वाला करुणेचा स्पर्श होता. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘युगपुरुष’ ठरतात, असे डॉ. कदम यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले हे महाविद्यालयाचे तब्बल २५ वर्षे प्राचार्य होते. त्यांच्या नीतीमूल्यसंपन्न, चारित्र्यवान आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे विद्यार्थी तसेच समाजातील सर्व घटकांमध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे मोठमोठे कार्यक्रमही पोलीस यंत्रणेची मदत न घेता शिस्तबद्धपणे पार पडत असत.
“अर्धशतकभर त्यांनी अवघ्या मराठी मनावर संस्कार केले. ही साधी गोष्ट नव्हे. विद्यार्थ्यांनी व समाजातील प्रत्येकाने प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना आपल्या जीवनातील दीपस्तंभ मानून वाटचाल केली, तर निश्चितच व्यक्तिमत्त्व विकास साधता येईल,” असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभागप्रमुख प्रो. डॉ. संजय दीक्षित यांनी करून दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनीचे चेअरमन प्रो. डॉ. नवनाथ रासकर यांनी आभार मानले. डॉ. सीता जगताप व प्रा. शैला क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले