(फलटण / प्रतिनिधी)श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आजच्या सोशल मीडिया स्टेटसमधील सूचक मजकुरामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या निधीतून सुरू झालेली आणि आता पूर्णत्वास गेलेली विकासकामे सध्या नव्या लोकप्रतिनिधींकडून भूमिपूजन व लोकार्पणाच्या माध्यमातून पुढे आणली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर रामराजेंच्या या स्टेटसकडे राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे.
“सत्ता बदलली म्हणून कामाचा इतिहास बदलत नाही!”
असा स्पष्ट राजकीय सूर या स्टेटसमधून उमटताना दिसत आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी एखाद्या कामासाठी निधी आणला, सातत्याने पाठपुरावा केला आणि शासनाकडून मंजुरी मिळवून दिली, त्या कामाचे भूमिपूजन अथवा लोकार्पण करताना संबंधित लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्याचा मोठेपणा दाखवणे, हीच लोकशाहीची आणि राजकीय संस्कृतीची खरी ओळख असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.
“आमदार कोण आहे, हा प्रश्न नाही; कामासाठी निधी कोणी आणला, पाठपुरावा कोणी केला आणि मंजुरी कोणी मिळवून दिली, हा खरा प्रश्न आहे,” या भूमिकेमुळे हा संदेश नेमका कोणासाठी आहे, याची चर्चा फलटणमध्ये रंगली आहे.
विशेष म्हणजे, सत्तेतील बदलानंतर पूर्वी मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय कोणाला द्यायचे, हा मुद्दा फलटणच्या राजकारणात पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामराजेंच्या आजच्या स्टेटसमधून “सत्तेचा बदल होऊ शकतो; मात्र विकासकामांचा इतिहास बदलता येत नाही,” असा अप्रत्यक्ष संदेश दिला गेला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, हा सूचक संदेश नेमका कोणाच्या भूमिकेवर भाष्य करणारा आहे आणि आगामी काळात त्यावर आमदार सचिन पाटील काय प्रतिक्रिया देतात, याकडे फलटणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.