मुधोजी महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या सुधारित अभ्यासक्रमावर कार्यशाळा उत्साहात संपन्न : NEP-2020 अंतर्गत विद्यार्थीकेंद्रित व कौशल्याधारित शिक्षणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ; १०० प्राध्यापकांचा सहभाग
( जावली /अजिंक्य आढाव ) : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एस्सी. भाग-३, सेमिस्टर-५ व ६ च्या रसायनशास्त्र विषयाच्या NEP-2020 अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या प्रायोजकत्वाखाली दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेली ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या उद्घाटन सत्रात रसायनशास्त्र विभागप्रमुख तथा कार्यशाळेचे संयोजक प्रा. (डॉ.) एस. पी. आचार्य यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रा. (डॉ.) आर. व्ही. गुरव विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. के.आर.बी.पी. महाविद्यालय, इस्लामपूरचे प्रा. (डॉ.) आर. के. माने यांनी बीजभाषण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. IQAC समन्वयक प्रा. (डॉ.) डी. पी. शिंदे यांचीही विशेष उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे प्रा. (डॉ.) आर. व्ही. गुरव यांनी NEP-2020 अंतर्गत सुधारित अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थीकेंद्रित, बहुविषयक, कौशल्याधारित, क्षमता-विकसनात्मक तसेच परिणामाधारित शिक्षणपद्धती विकसित करण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम यांनी मार्गदर्शन करताना NEP-2020 मधील मूलभूत तत्त्वांचा अभ्यासक्रमरचना आणि शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावी समावेश केल्यास उच्च शिक्षणाची गुणवत्ता, उपयुक्तता व परिणामकारकता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुधारित अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत सेंद्रिय, असेंद्रिय आणि भौतिक रसायनशास्त्र या तीन प्रमुख विषयांवर स्वतंत्र सत्रे घेण्यात आली. सेंद्रिय रसायनशास्त्रावर प्रा. (डॉ.) एस. एम. खेत्रे, असेंद्रिय रसायनशास्त्रावर प्रा. (डॉ.) एस. एच. बुंगले, तर भौतिक रसायनशास्त्रावर प्रा. (डॉ.) ए. आर. सुपले यांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम (SEC) आणि क्षेत्रीय प्रकल्प (FP) या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा झाली. प्रा. (डॉ.) जी. एच. निकम यांनी IKS संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर SEC व FP च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सहभागी प्राध्यापकांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
समारोप सत्रात सहभागी प्राध्यापकांकडून कार्यशाळेबाबत अभिप्राय घेण्यात आला व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम होते. डॉ. एम. पी. पाटील यांनी आभार मानले, तर श्रीमती जे. एस. काळेळ व डॉ. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
शिवाजी विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांमधील तब्बल १०० प्राध्यापकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मुधोजी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.