फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामावर सुरक्षा रक्षकाचा अपघाती मृत्यू ! अज्ञात वाहन चालकासह के.सी.पी.एल. कंपनीविरोधात गुन्हा ; सुरक्षा उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह
(दुधेबावी | प्रतिनिधी )फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथे फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रस्ता कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने, दिशादर्शक फलक आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याचा गंभीर आरोप मृताच्या भावाने केला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकासह कालुवाला कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (के.सी.पी.एल.) या रोड कंस्ट्रक्शन कंपनीविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मृताचे नाव नारायण शंकर सोनवलकर (वय ५५, रा. भाडळी खुर्द, ता. फलटण) असे आहे. ते गेल्या वर्षभरापासून के.सी.पी.एल. कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होते. त्यांची ड्युटी सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत असायची. सध्या झिरपवाडी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
पहाटे अपघाताची धक्कादायक माहिती
फिर्यादी बापूराव शंकर सोनवलकर (वय ४३, व्यवसाय शेती, रा. भाडळी खुर्द) यांनी दिलेल्या खबरी जबाबानुसार, दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नारायण सोनवलकर नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यानंतर दि. १२ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१५ वाजता त्यांचा पुतण्या धीरज बाळासाहेब सोनवलकर याचा फोन आला. ‘नारायण दादांचा कामाच्या ठिकाणी अपघात झाला आहे, तुम्ही तातडीने या,’ अशी माहिती त्यांना देण्यात आली.
सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याचा आरोप
फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, नारायण सोनवलकर यांच्या अंगावर साधे कपडे होते. कंपनीकडून सुरक्षा रक्षकासाठी आवश्यक असलेले सेफ्टी किट पुरविण्यात आलेले दिसून आले नाही. तसेच रस्त्यावरील वाहतूक वळविण्यासाठी आवश्यक दिशादर्शक फलक, रस्ता सुरक्षिततेचे निकष आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० ते पहाटे ५.१५ या कालावधीत झिरपवाडी येथे रस्ता बंद असल्याने पर्यायी मार्गाने जाणाऱ्या वाहनांना हातवारे करून जाधववाडी रोडने पाठविण्याचे काम नारायण सोनवलकर करीत होते. याचदरम्यान अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कंपनीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह
या घटनेत अज्ञात वाहन चालकाच्या निष्काळजीपणासोबतच के.सी.पी.एल. कंपनीने सुरक्षा रक्षकाला आवश्यक सेफ्टी किट न देणे, आवश्यक प्रशिक्षण न देणे, पुरेशी प्रकाश व्यवस्था न करणे आणि साध्या गणवेशात काम करून घेणे, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रस्ता देखभाल व सुरक्षिततेचे निकष न पाळल्याने कामगाराच्या जीवितास धोका निर्माण करण्यात आला, असा दावा फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी अज्ञात वाहन चालक तसेच कालुवाला कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (के.सी.पी.एल.) कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेने भाडळी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात की नाही, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.