(फलटण / प्रतिनिधी): प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण, जलस्रोत, शेती तसेच पशुपक्षी आणि वन्यजीवांवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी ‘प्लास्टिकमुक्त फलटण तालुका’ अभियानाचा शुभारंभ संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, नांदल येथे उत्साहात करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ फलटण तालुका, नेचर अँड वाइल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, गोविंद फाउंडेशन आणि फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने, संस्थापक अध्यक्ष आ. मा. रो. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा निर्धार तरडगाव केंद्राच्या कार्यक्षेत्रातील तब्बल ४५ शाळांमध्ये हे अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याने प्लास्टिकचा वापर कमी करण्याची सुरुवात स्वतःपासून करून कुटुंबीयांसह समाजालाही पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे सचिव रो. प्रा. डॉ. सुधीर इंगळे तसेच नेचर अँड वाइल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीच्या पायल चांडक यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, जलस्रोतांचे संरक्षण तसेच पशुपक्षी आणि वन्यजीवांच्या रक्षणाची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
४५ शाळांमधून व्यापक जनजागृती
तरडगाव केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण परिषदेत ‘प्लास्टिकमुक्त फलटण तालुका’ अभियानाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक यांच्या सहभागातून अभियान व्यापक करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
“प्लास्टिकला नकार देऊया, पर्यावरणाला होकार देऊया!” या संदेशातून फलटण तालुका प्लास्टिकमुक्त करण्यासाठी व्यापक जनसहभाग उभारण्याचा निर्धार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही जनजागृती आगामी काळात प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.