(जावली /अजिंक्य आढाव )फलटण मुधोजी महाविद्यालय अंतर्गत IQAC , कलाविष्कार , कल्चरल क्लब,कौशल्य विकास समिती व इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “पर्यावरणपूरक शाडू मातीचा गणपती बनवण्याची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली .
प्रा .लक्ष्मीकांत वेळेकर , कलाविष्कार विभागप्रमुख यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती तयार करण्याचे कौशल्य विकसित करणे गरजेचे असून पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे.गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे असे स्पष्ट केले .
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रा .डॉ . मृणाली चव्हाण यांनी शाडू मातीचे महत्त्व तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पाण्याचे होणारे प्रदूषण याबद्दल माहिती दिली. त्यानंतर गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी शाडू माती, पाणी आणि आवश्यक साधनसामग्री यांची माहिती दिली .
मूर्ती बनवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी माती मळणे, मूर्तीचा आकार तयार करणे, विविध अवयव घडवणे आणि मूर्तीला आकर्षक रूप देणे अशा विविध टप्प्यांत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने सुंदर गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेत 40विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला .
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो .डॉ .पी .एच .कदम सरांनी या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना नवीन कलाकौशल्य शिकण्याबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजले तसेच “शाडू मातीचा गणपती बनवा, पर्यावरण वाचवा” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल असा विश्वास व्यक्त केला .
निश्चितच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूक राहून समाजात ही जाणीवजागृती निर्माण केली तर या कार्यशाळेचा उद्देश सफल होईल असे मार्गदर्शन केले .
या कार्यशाळेकरीता IQAC समन्वयक प्रो. डॉ . टी .पी .शिंदे ,प्रा.विशाल गायकवाड , प्रा. डॉ .सागर निकम , प्रा . नवनाथ कुंभार उपस्थित होते .