(फलटण | प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित शालेय विभागीय क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत फलटणच्या इंद्रजीत मयूर गुंजवटे याने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत धडक मारली आहे. १७ वर्षांखालील वयोगटातून महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याने फलटणच्या क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे होणार असून, या स्पर्धेत इंद्रजीतला आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
इंद्रजीतच्या या यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंगराव गुंजवटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
इंद्रजीतच्या निवडीमुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट कामगिरी करून फलटणचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.