(जावली /अजिंक्य आढाव ): फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांना आळा घालत फलटण ग्रामीण पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेऊन ट्रान्सफॉर्मर चोरीचे तब्बल ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील आरोपी राज मिथुन शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण) आणि सनी रमण भोसले (रा. सरडे, ता. फलटण) यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळवून तपास सुरू केला. आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ तसेच भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(४) अन्वये पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गुन्ह्यांतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मागील एका महिन्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर व मोटार चोरीचे एकूण १९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून पोलिसांच्या या कामगिरीचे समाधान व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस नाईक नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी कारवाईत सहभाग घेतला.
ट्रान्सफॉर्मर चोरीच्या वाढत्या घटनांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.