(फलटण/ प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सप्टेंबर २०२६ दिनदर्शिकेतील निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे विधी सेवा योजनांची जनजागृती करणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
फलटण तालुका विधी सेवा समिती, फलटण वकील संघ आणि मुधोजी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. पी. एच. कदम यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची पार्श्वभूमी, त्याचे महत्त्व आणि उद्देश स्पष्ट केला. साक्षरतेसोबतच नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची व कर्तव्यांची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अॅड. शितल अहिवळे यांनी Anti-Ragging Laws तसेच Drug Awareness and Wellness Navigation याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी POCSO Act बाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. सहाय्यक दिवाणी न्यायाधीश, फलटण मा. श्री. जे. एन. जाधव यांनी Fundamental Duties of the Citizens अर्थात नागरिकांची मूलभूत कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. पी. जी. भोसले, जिल्हा न्यायाधीश, फलटण यांनी विविध उदाहरणे व दाखले देत नियम, कायदे आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. पायल जाधव हिने केले, तर अॅड. अनिरुद्ध सस्ते, सचिव, वकील संघ, फलटण यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कायदे, नागरिकांची कर्तव्ये आणि उपलब्ध विधी सेवा योजनांची माहिती मिळाल्याने कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला