(जावली/ अजिंक्य आढाव ): जिंती, ता. फलटण येथील बिरोबा मंदिरात झालेल्या चोरीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत २२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिरातील चोरीच्या घटनेचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेला सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंती गावच्या हद्दीतील बिरोबा मंदिरातून पितळी समई, पितळी घंटा व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी फिर्यादी हरीष विठ्ठल कोळेकर, रा. कोळेवस्ती, पिंपळवाडी, ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
चोरीची घटना दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ व पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.
तपासादरम्यान जय संजय वेदपाठक (वय २२), रा. पिंपळवाडी, ता. फलटण याला निष्पन्न करून दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.२० वाजता अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र पिसे करीत आहेत. फलटण ग्रामीण पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मंदिरातील चोरीचा अल्पावधीत छडा लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.