(फलटण /प्रतिनिधी) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सातारा यांच्या संचालकपदी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल मुधोजी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे लोकविकासाचा ध्यास असलेले, संयमी, पुरोगामी आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. त्यांना सहकार व बँकिंग क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या ते श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लिमिटेड, फलटणचे चेअरमन तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामे केली आहेत.
सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि विकासाभिमुख कार्यशैली यांच्या बळावर त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सहकार क्षेत्रासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सत्कारप्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. आर. वाय. गायकवाड, मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर पवार, प्रो. डॉ. अशोक शिंदे आणि वरिष्ठ लिपिक श्री. दिलीप कुमरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.