(फलटण /प्रतिनिधी ): मुधोजी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने सॉक्रेटिस क्लबचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त नव सह्याद्री अभियांत्रिकी महाविद्यालय, नसरापूर येथील प्रा. अनिकेत चव्हाण यांनी ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या विषयावर विद्यार्थ्यांना उद्बोधक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते.
प्रा. अनिकेत चव्हाण यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत भारतीय तत्त्वज्ञानाचा आढावा घेतला. पीपीटीच्या माध्यमातून त्यांनी विषय अधिक रंजक व प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडला. वेद आणि उपनिषदांमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचा उगम असला, तरी त्याच काळात जैन, बौद्ध आणि चार्वाक यांसारख्या स्वतंत्र विचारधाराही भारतभूमीत उदयास आल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.भारतीय तत्त्वज्ञान ही संकल्पना केवळ एका विशिष्ट दर्शनापुरती मर्यादित नसून भारतातील विविध विचारधारांचा त्यात समावेश होतो. भारतीय दर्शनांमध्ये प्रामुख्याने नऊ दर्शनांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनी या दर्शनांचा सखोल अभ्यास केल्यास त्यांच्या जीवनदृष्टीत आणि जीवनशैलीत निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.‘एआयच्या माध्यमातून प्राचीन तत्त्वज्ञांशी संवाद साधता येईल’कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) योग्य वापर करून प्राचीन काळातील तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ यांच्या विचारांचा अभ्यास करता येऊ शकतो. तत्त्वज्ञान, अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून जीवन अधिक प्रगल्भ करता येते, असेही प्रा. चव्हाण यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. एच. कदम म्हणाले की, मानवी जीवनात अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींची आवश्यकता आहे. तत्त्वज्ञान मानवी जीवनाला दिशा देणारे आणि उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करावा. क्वांटम फिजिक्सचा अभ्यास करताना भारतीय तत्त्वज्ञानातील काही संकल्पना अधिक स्पष्ट होताना दिसतात. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान बाह्य जीवनासाठी, तर तत्त्वज्ञान आंतरिक जीवनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.तत्त्वज्ञान केवळ सैद्धांतिक पातळीवर न राहता वैयक्तिक व सामाजिक जीवनात आचरणात आणल्यास समाजाचे निश्चितच कल्याण होऊ शकते, असे प्राचार्य डॉ. कदम यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. एन. के. रासकर यांनी करून दिला. आभारप्रदर्शन कु. सुहानी मदने यांनी केले. सूत्रसंचालन कु. पायल अहिवळे व कु. स्नेहा कर्चे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.