(फलटण/ प्रतिनिधी ) : फलटण शहरात विनानंबर मोटारसायकलवरून देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन तरुणांना फलटण शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तुल, एक जिवंत काडतूस तसेच विनानंबर मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनशाम बल्लाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसम विनानंबर मोटारसायकलवरून पिस्तुल विक्री करण्याच्या उद्देशाने फलटण शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक जगदाळे व शिंदे यांच्यासह डी.बी. पथकाला सूचना देऊन संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार फलटण शहर पोलिसांच्या पथकाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फलटणजवळ सापळा रचला. संशयित दोघे विनानंबर युनिकॉर्न मोटारसायकलवरून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाच्या कमरेला खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल तसेच पिस्तुलाच्या मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३०३/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल
२०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस
अंदाजे १ लाख १५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची विनानंबर युनिकॉर्न मोटारसायकल
या कारवाईत जय दयानंद मागाडे (वय २०, रा. आंबेडकरनगर, साखरवाडी, ता. फलटण) आणि प्रदीप संतोष गारे (वय २२, रा. खामगाव रोड, साखरवाडी, ता. फलटण) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनशाम बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक एस. के. शिंदे, डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाटे, मुकेश घोरपडे, जितेंद्र टिळे, अतुल वडे यांनी केली.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.