(फलटण/ प्रतिनिधी )–फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील स्मशानभूमीजवळील आठमोरी कॅनॉल परिसरात बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीजवळील आठमोरी कॅनॉल परिसरात बाभळीच्या झाडाला एका अनोळखी पुरुषाने गळफास घेतल्याचे दिसून आले. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मयत रजि. क्र. १४/२०२६) करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता कलम १९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास फलटण शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बारेला करीत आहेत. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.