(जावली /अजिंक्य आढाव ): मिरढे गावचे सुपुत्र धनंजय बाळू काळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महसूल सहाय्यक (Revenue Assistant) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे मिरढे गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धनंजय यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिरढे येथे झाले. त्यानंतर त्यांनी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथून पदवी प्राप्त केली.
शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून धनंजय यांनी सन २०२२ पासून MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी तिसऱ्याच प्रयत्नात यश मिळवत महसूल सहाय्यक पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची चिकाटी महत्त्वाची ठरली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी धनंजय यांचा यशस्वी प्रवास प्रेरणादायी असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या निवडीमुळे मिरढे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गावकऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
धनंजय काळे यांना भविष्यातील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा देत सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.