कृषी व व्यापार

डाळिंब शेतीशाळेत जैविक व नैसर्गिक औषधांचा वापर; महिलांना दशपर्णी अर्क व जीवामृत निर्मितीचे प्रशिक्षण

(जावली/ अजिंक्य आढाव) : ग्रामपंचायत समोरील हनुमान मंदिर, आंदरुड येथे डाळिंब पिकावरील नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेत जैविक व नैसर्गिक औषधांचा वापर, दशपर्णी अर्क व जीवामृत निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शेतीशाळेसाठी क्रांतीज्योती महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, श्रीकृष्ण महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट आणि आदर्श महिला बचत गटातील 40 हून अधिक महिला शेतकरी उपस्थित होत्या. डाळिंब शेतीतील वाढता रासायनिक औषधांचा खर्च कमी करून विषमुक्त उत्पादन घेण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सतीश हिप्परकर यांनी महाराष्ट्र राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची माहिती देत दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले. कडुनिंब, रुई, धोतरा, करंज यांसह दहा कडू वनस्पतींची पाने आणि गोमूत्र वापरून नैसर्गिक कीटकनाशक कसे तयार करावे, त्याचा डाळिंब, भाजीपाला व कडधान्य पिकांवर कसा वापर करावा तसेच विविध किडी व रोगांवर त्याचा कसा परिणाम होतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जीवामृत तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदेही उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

सहाय्यक कृषी अधिकारी संजय करचे यांनी डाळिंब बागेतील हुमणी व वाळवी किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, पक्षी थांबे, रोमन ट्रॅप, मेटारायझियम बुरशी व निंबोळी पेंड यांसारख्या रसायनमुक्त उपाययोजनांची माहिती दिली. नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण करून उत्पादन खर्च कमी करण्यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग समन्वयक किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सखी विद्या हेमंत हरिहर, कृषी सखी राजश्री दनाने तसेच सर्व महिला बचत गटांच्या अध्यक्षांनी केले होते. यावेळी महिलांनी स्वतः दशपर्णी अर्क तयार करून त्याच्या वापराबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला.

“आम्ही आता स्वतः दशपर्णी अर्क व जीवामृत तयार करून वापरणार आहोत. त्यामुळे औषधांवरील खर्चात मोठी बचत होईल आणि विषमुक्त डाळिंब उत्पादन घेणे शक्य होईल,” असा विश्वास सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या अध्यक्षा विद्या हेमंत हरिहर आणि सुनंदा राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला.

Back to top button
Don`t copy text!