कृषी व व्यापार

डाळिंब,कांदा व मका भाजीपाला पिकांसाठी नैसर्गिक उपायांचा मंत्र ; आंदरुडमध्ये महिलांचे विशेष प्रशिक्षण

(जावली /अजिंक्य आढाव) : आंदरुड ग्रामपंचायत समोरील हनुमान मंदिर परिसरात आयोजित डाळिंब पिकावरील नैसर्गिक शेती शाळेत जैविक व नैसर्गिक औषधांचा वापर, दशपर्णी अर्क व जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमात पाच महिला बचत गटांतील 40 हून अधिक महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

क्रांतीज्योती महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, श्रीकृष्ण महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट आणि आदर्श महिला बचत गटातील सदस्यांनी या शेतीशाळेत सहभाग घेतला. डाळिंब शेतीमध्ये रासायनिक औषधांचा खर्च कमी करून विषमुक्त उत्पादन घेण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सतीश हिप्परकर यांनी महाराष्ट्र राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची माहिती देत दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. कडुनिंब, रुई, धोतरा, करंज आदी दहा प्रकारच्या कडू वनस्पतींची पाने व गोमूत्राच्या साहाय्याने नैसर्गिक कीटकनाशक कसे तयार करावे, त्याचा डाळिंब, भाजीपाला व कडधान्य पिकांमध्ये कसा वापर करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया व त्याचे फायदेही उपस्थितांना समजावून सांगितले.

सहाय्यक कृषी अधिकारी संजय करचे यांनी डाळिंब बागेतील हुमणी व वाळवी या किडींच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, पक्षी थांबे, रोमन ट्रॅप, मेटारायझियम बुरशी आणि निंबोळी पेंड यांचा वापर करून रसायनमुक्त नियंत्रणाच्या उपाययोजनांची माहिती दिली.

प्रभाग समन्वयक किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सखी विद्या हेमंत हरिहर, कृषी सखी राजश्री दनाने तसेच विविध महिला बचत गटांच्या अध्यक्षांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांनी स्वतः दशपर्णी अर्क तयार करून त्याच्या फवारणीचे प्रात्यक्षिकही अनुभवले.

यावेळी सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या अध्यक्षा विद्या हेमंत हरिहर व सुनंदा राजेंद्र राऊत यांनी, “आम्ही स्वतः दशपर्णी अर्क व जीवामृत तयार करून औषधांवरील खर्च कमी करू आणि विषमुक्त डाळिंब उत्पादनाला प्राधान्य देऊ,” असा विश्वास व्यक्त केला.

नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी आयोजित या शेतीशाळेमुळे महिला शेतकऱ्यांमध्ये पर्यावरणपूरक व खर्चबचतीच्या शेती पद्धतींबाबत जागरूकता निर्माण झाली.

Back to top button
Don`t copy text!