(फलटण/ प्रतिनिधी) : येत्या संसदीय अधिवेशनात ॲडव्होकेट ॲक्ट (सुधारित) कायदा सादर करून ॲडव्होकेट ॲक्ट १९६१ मध्ये व्यापक घटनात्मक, सामाजिक, लोकशाही व प्रशासकीय सुधारणा तात्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
भारतातील न्यायव्यवस्था ही संविधानाच्या मूलभूत रचनेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून वकील व्यवसाय हा न्यायदान व्यवस्थेचा अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया व विविध राज्य बार कौन्सिल्स या संस्था देशातील लाखो वकिलांचे प्रतिनिधित्व करीत असल्या तरी सध्याच्या व्यवस्थेमध्ये लोकशाही प्रतिनिधित्व, सामाजिक समावेशकता, महिला सहभाग, ग्रामीण प्रतिनिधित्व व पारदर्शकतेचा गंभीर अभाव असल्याची भावना वकिलांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील, नवोदित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, महिला, एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी व अल्पसंख्याक समाजातील वकिलांना प्रभावी प्रतिनिधित्व मिळत नसल्याने संविधानातील समानता व सामाजिक न्यायाच्या तत्वांच्या अधीन राहून ॲडव्होकेट ॲक्टमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्यास किमान एक प्रतिनिधित्व देणे, राज्य बार कौन्सिलमधील २५ सदस्यांची मर्यादा रद्द करणे, महिलांसाठी किमान ३३ टक्के आरक्षण, एससी, एसटी, ओबीसी व इतर घटकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व, नवोदित वकिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, निवडणूक खर्चावर मर्यादा, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण, ई-नामांकन प्रणाली, कार्यकाळ मर्यादा, ग्रामीण व आदिवासी भागातील वकिलांसाठी विशेष योजना आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
तसेच नवोदित वकिलांसाठी किमान मानधन, विमा, आरोग्य सुरक्षा, निवृत्ती वेतन व सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. बार कौन्सिलच्या कामकाजात पूर्ण पारदर्शकता आणून तक्रार निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
ॲडव्होकेट ॲक्ट १९६१ चे संपूर्ण पुनरावलोकन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, वरिष्ठ वकील, महिला प्रतिनिधी, ग्रामीण बार असोसिएशन व सामाजिक न्याय क्षेत्रातील तज्ज्ञांची राष्ट्रीय सुधारणा समिती स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ही सुधारणा न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, सर्वसमावेशक व संविधानसुसंगत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे ॲड. कांचन खरात यांनी सांगितले. यावेळी ॲड. मल्हारी गाढवे, ॲड. रेश्मा पठाण, श्रीकांत गावडे, अमर खंदारे व सागर चव्हाण आदी उपस्थित होते.